मनसेच्यावतीने कराडमध्ये एक सही संतापाची अभियान
News By : कराड | संदीप चेणगे
राज्यात सध्या सुरू असलेल्या सत्तेसाठीच्या राजकारणा विरोधात मनसेने सुरू केलेल्या एक सही संतापाची या मोहिमेला कराडकर नागरीकांनी मोठा प्रतिसाद दिला. लाहोटी कन्या शाळेसमोर लावलेला फलक वाचून नागरीक सह्या करीत होते. तर राज्यात सुरू असलेल्या राजकीय चिखलाविरोधात नागरीकांनी संताप व्यक्त केला. मनसेच्या वतीने राज्यातील राजकीय परीस्थीतीविरोधात राज्यभर एक सही संतापाची अभियान राबवण्यात येत आहे. शनिवारी सकाळी कराडला हे अभियान राबवण्यात आले. मनसेचे जिल्हाप्रमुख ऍड.विकास पवार, शहर अध्यक्ष सागर बर्गे, विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख विनायक भोसले, नितीन महाडीक, उत्तम बागल, मेजर राजू केंजळे, सतीश यादव, प्रविण गायकवाड, गोरख नारकर, हनुमंत भिंगारदेवे, अशुतोष दुर्गावळे, राहुल सपकाळ, संभाजी चव्हाण, मनसैनिक व नागरीक उपस्थीत होते. ऍड.विकास पवार म्ह्णाले की, सुसंस्कृत महाराष्ट्रात सध्या राजकीय चिखल झाल्याचे पहावयास मिळत आहे. कुठल्या पक्षाचा आमदार कुठल्या पक्षात आहे हे शोधण्याची वेळ आली आहे. सत्तेसाठी वाट्टेल ते करण्याच्या पुढऱयांच्या धोरणामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीला गालबोट लागत आहे. या विरोधात जनतेत प्रचंड प्रमाणात चिड निर्माण झाली आहे. जनतेच्या मनातील चिड व्यक्त करण्यासाठी राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसेच्या वतीने राज्यभर एक सही संतापाची हे अभियात राबवण्यात येत आहे. कराडकर नागरीकांच्या वतीने या अभियानास उत्सफुर्त प्रतिसाद मिळाल्याचे ऍड.विकास पवार म्ह्णाले. सागर बर्गे म्हणाले की, निवडणुकीत पक्षाकडे बघुन जनता मतदान करते आणी निवडणुकीनंतर केवळ सत्तेसाठी नेते मंडळींकडुन वाट्टेल तशी समिकरणे जुळवली जात आहेत. यामुळे जनतेच्या मतांचा अनादर होत आहे. तसेच गेल्या वर्षभरापासुन एखाद्या पक्षातील काही अमदार फुटुन दुसऱया पक्षाशी हातमिळवणी करीत आहेत. जाताना पक्ष व चिन्हही घेऊन जात आहे. यावरून अशा नेत्यांना पक्ष निष्ठा व विचारांचे काही देणे घेणे राहिले नसल्याचे समोर येत आहे. या सर्व राजकीय खेळाचा जनतेतुन संताप व्यक्त करण्यात येत असल्याचे सागर बर्गे म्हणाले.