शरद पवार गटाची तिसरी उमेदवार यादी घोषित, सातारा-रावेरमधून तिकिटं जाहीर, माढ्याचा तिढा कायम
News By : Muktagiri Web Team
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी लोकसभा उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. एक्स सोशल मीडिया अकाऊण्टवरुन दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातून शशिकांत शिंदे, तर रावेरमधून श्रीराम पाटील यांना तिकीट जाहीर करण्यात आलं आहे. महाविकास आघाडीने कालच पत्रकार परिषदेत जागावाटपाचं सूत्र जाहीर केलं. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्ष महाराष्ट्रात लोकसभेच्या दहा जागा लढवणार आहे. आतापर्यंत सात उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. त्यात आता सातारा आणि रावेर या दोन जागांची भर पडली आहे. त्यामुळे केवळ माढा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार घोषित करणे बाकी आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातून माजी मंत्री शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथे शिंदेंचं मोठं प्रस्थ आहे. २००९ ते २०१४ या काळात कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून शशिकांत शिंदे आमदारपदी निवडून आले होते. आघाडी सरकारच्या काळात त्यांच्याकडे जलसंपदा मंत्रिपद सोपवण्यात आले होते. भाजपने साताऱ्यातून उमेदवार जाहीर केला नसला, तरी उदयनराजेंची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यामुळे शिंदेंचा सामना त्यांच्याशी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, रावेरमधून श्रीराम पाटील यांना संधी देण्यात आली आहे. श्रीराम पाटील हे रावेर विधानसभेसाठी इच्छुक होते. त्यासाठी त्यांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत भाजप प्रवेशही केला, मात्र ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत श्रीराम पाटील हे हातातले कमळ सोडून तुतारी हाती घेतली आहे. रावेरमध्ये विद्यमान खासदार रक्षा खडसेंशी त्यांचा सामना होईल.