नितीन गडकरी यांनी उंब्रजच्या पुलाची व्यावहारिकता तपासण्याचे दिले आदेश
News By : Muktagiri Web Team
कराड: कराड तालुक्यातील उंब्रज या गावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सध्या भराव पूल असून त्याठिकाणी सेगमेंटल (पारदर्शक) उड्डाण पूल होणे अत्यावश्यक असल्याची मागणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे या भागातील नागरिकांनी केली होती त्यांच्या विनंतीनुसार केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्र ई मेल केले तसेच फोनवरून सुद्धा उंब्रज येथे सेगमेंटल (पारदर्शक) उड्डाण पूल होण्याची गरज सांगून चर्चा केली. त्यानुसार केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्राला उत्तर देऊन उंब्रज येथे मागणी केलेल्या सेगमेंटल (पारदर्शक) पुलाची व्यावहारिकता तपासून पुढील कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत असे पत्र पाठविले आहे. माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नांनुसार कराड व मलकापूर येथील जुना भराव उड्डाण पूल पाडून नवीन सेगमेंटल (पारदर्शक) उड्डाण पूल बांधण्याची प्रक्रिया सुरु असून त्यानुसार जुना भराव उड्डाण पूल पाडला असून नवीन पूल बांधण्याचे काम सुरु आहे. याच धर्तीवर उंब्रज येथील जुना भराव उड्डाण पुलामुळे उंब्रजचे दोन भाग झाले असून पुलाच्या बाजूला अरुंद सेवा रस्ता झाला असून येथे नित्याचीच वाहतूक कोंडी होत आहे. उंब्रज येथील बाजारपेठेचे अतोनात नुकसान यामुळे होत आहे. तसेच याच रस्त्यावर असलेला बस स्थानक वापरा अभावी पडून आहे. येथील नागरिक बस साठी राष्ट्रीय महामार्गावर उभा राहतात त्यामुळे अनेक अपघातांच्या घटना घडल्या आहेत. या सर्व गैरसोयी बद्दल स्थानिक नागरिकांनी माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन उंब्रज येथील भराव उड्डाण पूल पडून कराडच्या धर्तीवर सेगमेंटल म्हणजेच पारदर्शक पद्धतीचा उड्डाण पूल बांधला जावा अशी मागणी केली असून त्यांच्या मागणीचा गांभीर्याने माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी विचार करून केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना ई मेल द्वारे पत्र पाठवून फोनवरून सुद्धा प्रत्यक्ष चर्चा केली आहे त्यानुसार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आ. चव्हाण यांच्या पत्राला उत्तर देत उंब्रज येथील पुलाची व्यवहारिकता तपासून योग्य ती कार्यवाही केली जाईल असे आश्वासन पत्राद्वारे दिले आहे. यामुळे उंब्रज येथे लवकरच राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून उड्डाण पुलाची पाहणी करून पुढील कारवाई होईल. माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठपुराव्याबद्दल उंब्रज नागरिकांनी समाधान व्यक्त करीत आभार मानले आहेत.