देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व घटकांमध्ये आरोग्य व शरीराच्या तंदुरुस्तीबाबत जनजागृती निर्माण होण्यासाठी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) यांच्यावतीने २ ऑक्टोंबर रोजी ‘मास मॅरेथॉन स्पर्धे’चे आयोजन केले आहे.
सातारा : देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व घटकांमध्ये आरोग्य व शरीराच्या तंदुरुस्तीबाबत जनजागृती निर्माण होण्यासाठी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) यांच्यावतीने २ ऑक्टोंबर रोजी ‘मास मॅरेथॉन स्पर्धे’चे आयोजन केले आहे. ही स्पर्धा ११ किलोमीटर व पाच किलोमीटर या दोन गटात सकाळी सहा वाजता सुरु होणार असून, स्पर्धेचे आयोजन औद्योगिक परिसरात करण्यात आल्याची माहिती मासचे अध्यक्ष राजेंद्र मोहिते यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी स्पोर्ट कमिटीचे चेअरमन श्रीकांत तोडकर, उपाध्यक्ष जितेंद्र जाधव, स्पर्धेचे प्रायोजक टॉप गिअर ट्रान्समिशनचे श्रीकांत पवार आदी उपस्थित होते.
मोहिते म्हणाले, ‘‘मास ही संस्था सातारा जिल्ह्यातील उद्योजकांची अग्रगण्य संघटना असून जिल्ह्यामध्ये उद्योग वाढीसाठी प्रयत्न करत असते. त्याचबरोबर उद्योजक शासन व नागरिक यांच्यामध्ये समन्वय साधन उद्योग घटकांचे प्रश्न सोडवत असते. या व्यवसायासोबत कर्मचार्यांच्या आरोग्यविषयक घटकांमध्ये उत्तम बदल होण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत पश्चिम महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांसह सर्व वयोगटातील जास्तीत-जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे.’’
पवार म्हणाले, ‘‘मास मॅरेथॉन स्पर्धा अल्पावधित नावारुपाला येणार आहे. औद्योगिक वसाहत व ईतर सर्वच कर्मचार्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती व व्यायामाची निर्माण होण्यासाठी जनजागृती होण्याची आवश्यकता आहे.’’ यावेळी उदय देशमुख यांनी मार्गदर्शन केले.