कापीलच्या सरपंच कल्पना गायकवाड अपात्र
News By : Muktagiri Web Team
कराड, दि. 24 ः कापील ता. कराड ग्रामपंचायतीच्या सरपंच कल्पना गायकवाड अपात्र ठरल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या 24 बाय 7 पाणी पुरवठा योजनेतील ए.एम.आर.मीटर वापरात अनियमितता आढळून आल्याने पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी हा आदेश काढला आहे. कराड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांनी याला दुजोरा दिला आहे. कापीलचे माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश पवार यांनी याबाबत तक्रार केली होती. या तक्रारींची दखल घेऊन पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली आहे. कापील ग्रामपंचायतीची 24 बाय 7 नळ पाणी पुरवठा योजना ज्या लोकसंख्येकरिता मंजूर व कार्यान्वित झाली त्याच योजनेच्या लाभधारक कुटुंबांना मिटर्सचे वाटप करणे आवश्यक असताना पाचवड वस्ती येथे मूळ योजनेनुसार मंजूर नसलेल्या कुटुंबांना मिटर्सचे वाटप करण्यात आले. तसेच एकाच दराने सर्व कुटुंबांना मिटर्सचे वाटप केले नसलेचे चौकशी दरम्यान निदर्शनास आले. सरपंच कल्पना गायकवाड यांनी सदरचे 67 मिटर्स बसविण्यासाठी ग्रामपंचायतीच्या मान्यते शिवाय पुरवठादारास स्वतःच्या स्वाक्षरीने पत्रव्यवहार केला. तसेच मिटर्स ताब्यात येऊन त्याचे वाटप केले. याबाबतचा विषय 20 फेबु्रवारी 2020 रोजीच्या मासिक सभेपुढे चर्चेसाठी ठेवण्यात आला असतानाही अनाधिकाराने सरपंच यांनी तत्पूर्वीच 13 फेबु्रवारी 2020 रोजी पुरवठादारास पत्र देवून कार्यवाही केल्याचे समोर आले. तसेच मिटर्ससाठी लोकवर्गणीची 50 टक्के रक्कम प्रथम ग्रामपंचायतीच्या बँक खात्यामध्ये जमा करणे आवश्यक असताना परस्पर पुरवठादारास पत्र देवून 50 टक्के रक्कम मिटर्सधारकांकडून रोखीने घेऊन मिटर्स देण्याबाबत कळविले. ग्रामपंचायतीच्या मान्यतेशिवाय सरपंच कल्पना गायकवाड यांनी 67 मिटर्सबाबात कार्यवाही केली असल्याने त्यांनी प्रशासकीय व वित्तीय तत्वाचे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 39 नुसार त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे.