अशोकरावांच्या राजीनाम्यामुळे जरी धक्का बसला असला तरी पक्ष एकसंघ राहील : पृथ्वीराज चव्हाण
News By : Muktagiri Web Team
मुंबई : अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. त्यांनी त्यांची भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे त्यांच्यावर जास्त बोलणे योग्य नाही. पण नेते गेले तरीही कार्यकर्ते, मतदार, सामान्य जनता पक्षासोबत राहतील त्यामुळे चिंतेचे कारण नाही, आम्ही लढू आणि जनतेच्या न्यायालयात जाऊ असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. अशोक चव्हाण यांच्या राजीनामा सत्रानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधून पक्षाची भूमिका मांडली. यावेळी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, आ. अमीन पटेल, माजी मंत्री नसीम खान यावेळी उपस्थित होते. पत्रकार परिषदेच्या आधी उपस्थित नेत्यांची बैठक झाली असून त्यांनी काँग्रेस च्या सर्व आमदारांशी संपर्क साधला आहे. अशोक चव्हाण यांनी पुढची रणनीती जाहीर केली नसली तरी त्यांची दिशा स्पष्ट आहे. त्याबद्दल भाजपच्या नेतृत्वाकडून बऱ्याच दिवसांपासून सुतोवाच होत होतं. आज आम्ही बाळासाहेब थोरात आणि इतर सहकाऱ्यांनी काँग्रेसच्या विधीमंडळ सदस्यांशी संपर्क केलेला आहे. उद्या आणि परवा राज्यसभेची उमेदवारी भरण्याच्या वेळेला विधीमंडळ पक्षाची मीटिंग घेतली जाईल. या सर्व परिस्थितीत आम्ही ज्या-ज्या विधीमंडळ सदस्य आणि नेत्यांशी संपर्क साधलेला आहे, कुणीही जाणार नाही. भाजपकडून मुद्दाम वावड्या उठवल्या जात आहेत. नावं घेतली जात आहेत. पण त्यावर कुणीही विश्वास ठेवू नये”, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी आवाहन केलं. “काँग्रेस पक्ष हा जनतेमध्ये न्याय मागायला जाणार आहे. हे घडतंय ते कशामुळे घडतंय ते महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. भाजपला आज निवडणुकीला सामोर जायचं धाडस नाही. त्यामुळे विरोधी पक्षांचं विभाजन करुन आपल्याला काही संधी मिळते का? त्याचा प्रयत्न चाललेला आहे. नेतेमंडळी जरी गेले तरी त्यांना मते देणारे नेते, त्यांचे कार्यकर्ते आणि सर्वासामान्य जनता ही या नेत्यांच्याबरोबर कधीही जाणार नाही. निवडणुकीला ते जेव्हा सामोरे जातील तेव्हा त्यांचं खरं चित्र दिसेल. आम्ही आमचे सर्व सहकारी खंबीरपणे काँग्रेसच्या मागे उभे आहोत. अशोक चव्हाण यांनी जो दुर्देवी निर्णय घेतला आहे त्याबद्दल खंत व्यक्त करतो. ते योग्य निर्णय घेतील, अशी अपेक्षा करतो. त्यांच्यावर कसला दबाव होता, त्यांना कशाची भीती होती तेच याबाबत सांगू शकतील. पण काँग्रेस पक्ष मजबुतीने राजकीय आव्हानाला सामोरे जाणार आहे”, अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.