‘मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने भाजपा सरकारप्रमाणेच या समाजाला शिक्षण व रोजगारासाठी आरक्षित घटकांप्रमाणे सवलती द्याव्यात,’ अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी केली.
मुंबई : ‘मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने भाजपा सरकारप्रमाणेच या समाजाला शिक्षण व रोजगारासाठी आरक्षित घटकांप्रमाणे सवलती द्याव्यात,’ अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी केली.
चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, ‘संवैधानिक प्रक्रिया पूर्ण करून मराठा आरक्षण लागू करण्यास कालावधी लागत असताना भाजपा सरकारने मराठा समाजासाठी शिक्षण व रोजगारासाठी विविध सवलती दिल्या. पण भाजपा सरकारच्या सारथीसारख्या अनेक उपक्रमांमध्ये महाविकास आघाडी सरकारने अडथळे निर्माण केले आहेत आणि आर्थिक तरतूद रोखून संकटे निर्माण केली आहेत. महाविकास आघाडी सरकारने ताबडतोब आपली भूमिका बदलून मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी पावले टाकली पाहिजेत.’
भाजपा सरकारच्या पुढाकाराने मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत आरक्षण देण्यात आले व त्याचे लाभही मिळायला लागले होते. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचा विषय गेल्यानंतर राज्यातील शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने ढिलाई केली आणि आरक्षणाला स्थगिती आली. आता सर्वोच्च न्यायालयात कधी निकाल लागेल व पुन्हा आरक्षण लागू होईल, याबद्दल अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यामुळे पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला शिक्षणासाठी व रोजगारासाठी सवलती देऊन आरक्षणासारखा लाभ दिला पाहिजे. भाजपा सरकारने मराठा समाजाला अशा सवलती दिल्या होत्या.
पाटील म्हणाले, ‘भाजपा सरकारने मराठा समाजातील विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून सवलती दिल्या. त्यामध्ये वैद्यकीय, अभियांत्रिकी व कृषीसह 605 कोर्सेसचा समावेश केला. त्यासाठी साठ टक्के गुणांची अट काढली आणि उत्पन्नाची मर्यादाही क्रिमी लेयरप्रमाणे 8 लाख रुपये केली.’
ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकरी व कष्टकरी मजुरांच्या मुलांना शहरी भागात शिकण्यासाठी येणार्या अडचणी लक्षात घेऊन पदवी, पदविका, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना भाजपा सरकारकडून सुरू करण्यात आली. तसेच मराठा समाजासाठी वसतिगृहे उभारण्याचे काम हाती घेतले. भाजपा सरकारने अण्णासाहेब पाटील महामंडळासाठी मोठी आर्थिक तरतूद करून या महामंडळाचे पुनरुज्जीवन केले व त्याच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुणांना रोजगारासाठी मदत केली. छत्रपती राजाराम महाराज उद्योजक व कौशल्य विकास अभियानांतर्गत व्यवसाय व उद्योग याकरिता तीन योजना भाजप सरकारने सुरू केल्या.
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकाससंस्था (सारथी) ही संस्था भाजपा सरकारने सुरू केली. मराठा समूहाच्या प्रशिक्षण, संशोधन, कौशल्य विकास, नोकरी व्यवसाय मार्गदर्शन, भरतीपूर्व मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन यासाठी ही संस्था सुरू करण्यात आली. महाविकास आघाडी सरकारने या संस्थेचे संपूर्ण कामकाज ठप्प केले आहे. आमच्या सरकारने 13 उपक्रम सुरू केले होते. अत्यंत जोमाने काम चालू होते, ते सर्व बंद केले आहेत. तसेच सारथीची स्वायत्तता काढण्यात आली. महाविकास आघाडी सरकारने आपली भूमिका बदलून सारथी संस्थेला पाठबळ दिले पाहिजे.