शिवसेनेतील बंडखोरीनंतर केवळ महाविकासआघाडी सरकारच कोसळलं नाही, तर अगदी शिवसेना कोणाची हाही प्रश्न उपस्थित झाला. यावर सर्वोच्च न्यायालयात घटनापीठासमोर सुनावणी सुरू असतानाच आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्नभूमीवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर सुरू केलेला ऐतिहासिक दसरा मेळावा कोण घेणार यावरून वाद निर्माण झाला.
आता या वादावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेच्या ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली. तसेच मुंबई महानगरपालिकेने आपल्या अधिकारांचा गैरवापर केल्याचंही महत्त्वाचं निरिक्षण नोंदवलं. दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी ठाकरे गटाच्या याचिकेविरोधात हस्तक्षेप याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली. तसेच शिवसेना कुणाची याबाबत नसल्याचं स्पष्ट केलं. यावेळी पालिकेचा निर्णय नाकारण्याचा निर्णय वास्तविकतेला धरून नाही, असं निरिक्षण न्यायालयाने नोंदवलं. दादर पोलिसांचं संख्याबळ पाहता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत असल्याचंही न्यायालयाने नमूद केलं.