कोणी कितीही अफवा पसरवल्या तरी किकली गावातूनच काय पण संपूर्ण परिसरातून शेतकरी विकास पॅनेललाच अधिक मतदान होईल.
भुर्ईंज : कोणी कितीही अफवा पसरवल्या तरी किकली गावातूनच काय पण संपूर्ण परिसरातून शेतकरी विकास पॅनेललाच अधिक मतदान होईल. किसन वीर कारखान्याची मालकी सर्वसामान्य शेतकर्यांचीच रहावी यासाठी शेतकरी सभासदांनी शेतकरी विकास पॅनेलच्याच पाठिशी भक्क़मपणे उभे रहावे, असे आवाहन किकलीचे सरपंच धनंजय बाबर किकली, ता. वाई येथे बोलताना केले.
शेतकरी विकास पॅनेलच्या प्रचारानिमित्त झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पै. मधुकर शिंदे, किशोरकाका बाबर, शिवाजीराव बाबर, सुरेश बाबर सावकार, उमेदवार दिलीप शिंदे, पै. जयवंत पवार, हणमंत गायकवाड, महान महाराष्ट्र केसरी पै. माणिक पवार, संजय जाधव, हंबीरराव बाबर, अशोक शेडगे, शामराव शिंदे, तंटामुक्तीचे अध्यक्ष रामदास बाबर, प्रशांत बाबर, मोहन बाबर, वीरसींग बाबर, गणपत महामुणी, पांडुरंग आवळे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
किशोरकाका बाबर म्हणाले, स्व. गजानन बाबर यांच्या आत्म्याला वेदना होईल असे कृत्य कधीच हातून घडणार नाही. त्यांनी आयुष्यभर ज्यांच्याशी संघर्ष केला तो संघर्ष आज महत्वाच्या टप्प्यावर येवून ठेपला आहे. किसन वीर कारखाना खासगी झाला तर किकली गेट वरुन हायवेकडे जाणंही मुश्कील होईल. सात वषार्र्ंपूर्वी कारखाना महिन्यात जप्त होणार आहे असे सांगून निवडणुकीतून पळ काढला. आताही तेच म्हणतायत. मग कारखान्यासाठी एवढा जीव का टाकलाय. नेमका हा कारखाना कोणाच्या घशात घालायचा आहे? हे सभासद ओळखून आहेत.
पै. मधुकर शिंदे म्हणाले, माझ्याबाबतीत अफवा उठवण्यात आल्या. मात्र मी शेतकरी विकास पॅनेलच्याच पाठिशी खंबीरपणे उभा आहे. किसन वीर कारखान्यासमोर अडचणी आहेत मात्र त्या अडचणी सोडवण्याची जबाबदारी फक्त शेतकरी विकास पॅनेलच पार पाडेल.