वरकुटे-मलवडी येथील कोरोना केअर सेंटर रुग्णांना ठरतेय संजीवनी
News By : Muktagiri Web Team
वरकुटे-मलवडी, ः कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने रुग्णांना रुग्णालयात बेड्स उपलब्ध होत नाहीत. बेड्स मिळत नसल्याने अनेक रुग्णांचे हाल होत आहेत. अनेकांना वेळेत उपचार मिळत नसल्याने कोरोना रुग्णांचा मृत्यूही होत आहेत. कोरोनाच्या प्रकोपामुळे रुग्णालयात बेड्स उपलब्ध नसणे आणि त्यामुळे होणारे रुग्णांचे हाल थांबवण्यासाठी वरकुटे-मलवडी येथील माणदेश फाउंडेशन संचालित संकल्प कोरोना केअर सेंटर ग्रामीण भागातील रुग्णांना संजीवनी ठरत आहे. सामाजिक बांधिलकी जपत यशवंतराव चव्हाण हायस्कुलमध्ये हे कोविंड सेंटर बनवले आहे.
वरकुटे-मलवडी परिसरातील ग्रामीण भागातील कोरोनाग्रस्थाची होणारी फरफट थांबवण्यासाठी राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस अभयसिंह खाशेराव जगताप यांच्या प्रयत्नाने गावातील हायस्कुल मध्ये 7 ऑक्सीजन बेड सहित 60 बेडचे सुसज्ज असे कोरोना केअर सेंटर सुरू केले आहे. यामध्ये परिसरातील कुरणेवाडी, महाबळेश्वरवाडी, बनगरवाडी, शेनवडी, कळचौंडी, जांभूळणी, वळई इ. गावातील रुग्ण उपचार घेत आहेत.
अनेकवेळ रुग्णांना खाजगी रुग्णालयामध्ये बेड न मिळणे, कधी पैशांभावी उपचार नाकारणे अशा अनेक अडचणीत सापडलेल्या रुग्णांना वरकुटे-मलवडी येथील ’संकल्प’ कोविड केअर सेंटर संजीवनीच ठरत आहे. ’संकल्प’ कोविड केअर सेंटरमध्ये सर्व उपचार मोफत होत आहेत. तसेच रुग्णांचा एचआरटीसी करायचा असल्यास म्हसवड येथे जाण्यासाठी मोफत रुग्णवाहिका 24 तास उपलब्ध आहे. या सेंटरचा संपूर्ण परिसर सीसीटीव्ही कक्षेत असल्यामुळे सर्व परिसरावर नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवण्यात येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे येथील रुग्णांवर तज्ञ एम डी मेदिसिन डॉक्टरच्या सल्ल्याने उपचार केले जातात. डॉक्टर्स, नर्स आणि सपोर्ट असा मिळून जवळपास 15 जणांचा स्टाफ या सेंटर मध्ये काम करतो.
त्याचबरोबर संजय जगताप सर, सरपंच विजय जगताप, बाळासाहेब आटपाडकर, धीरज जगताप, हनुमंत आटपाडकर, अमोल जगताप, जालिंदर वाघमोडे, दिलीप खरात, सागर यादव आणि ऋषिकेश वसंतराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवकांची मोठी टीम रुग्णांच्या सेवेसाठी सदैव हजर असते.