भांडवलदारांनी खरेदी केलेला सहकारातील जरंडेश्वर साखर कारखाना चालण्यासाठी किसन वीर सहकारी साखर कारखाना बंद पाडण्याचा घाट विरोधकांनी घातला आहे. निवडणुकीआधीच सभासद शेतकर्यांकडून प्रत्येकी 15 हजार रूपये गोळा करून कारखाना चालविण्याचे गणित मांडले जात आहे. नंतर त्याच्या खाजगीकरणाचाही डाव आहे. या विरोधकांना खड्ड्यात घाला, असा घणाघात कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी आमदार मकरंद पाटील व नितीन पाटील यांचे नाव न घेता केला.
कोरेगांव : भांडवलदारांनी खरेदी केलेला सहकारातील जरंडेश्वर साखर कारखाना चालण्यासाठी किसन वीर सहकारी साखर कारखाना बंद पाडण्याचा घाट विरोधकांनी घातला आहे. निवडणुकीआधीच सभासद शेतकर्यांकडून प्रत्येकी 15 हजार रूपये गोळा करून कारखाना चालविण्याचे गणित मांडले जात आहे. नंतर त्याच्या खाजगीकरणाचाही डाव आहे. या विरोधकांना खड्ड्यात घाला, असा घणाघात कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी आमदार मकरंद पाटील व नितीन पाटील यांचे नाव न घेता केला.
किसन वीर साखर कारखान्याच्या निवडणुक प्रचारार्थ वाघोली (ता. कोरेगांव) येथील भैरवनाथ मंदिरात शेतकरी विकास पॅनेलच्या प्रचार शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. उमेदवार अॅड. मेघराज भोईटे, शहाजी भोईटे, वाघोलीचे सरपंच बशीरखान पठाण, सोसायटीचे चेअरमन सुभाष कोरडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तथाकथित जननायक लाल दिव्यासाठी ‘किसन वीर’ बारामतीकरांच्या घशात घालेल
कोरेगाव तालुक्यातील जनतेच्या मनात जरंडेश्वरच्या खाजगीकरणाबद्दल प्रचंड संताप आहे, असे निदर्शनास आणून देऊन आमदार महेश शिंदे पुढे म्हणाले, कोरेगावच्या माजी आमदाराला लाल दिवा हवा होता. डॉ. शालिनीताईंनी व सभासद शेतकर्यांनी मोठ्या कष्टाने उभारलेला जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना कवडीमोलाने भांडवलदारांच्या घशात घालण्यासाठी याच माजी आमदारांनी मदत केली. त्यांना लाल दिवा मिळाला. पुढे काय झाले? आज मी तुमच्यासमोर उभा आहे. वाईच्या तथाकथित जननायकालाही लाल दिवा हवा आहे. मग करायचे काय ? तर किसन वीर कारखाना अडचणीत आणायचा. तो भांडवलदार बारामतीकरांच्या घशात घालायचा. मग यांना लाल दिवा मिळणार, असे त्यांचे गणित आहे.
सभासदांकडून 15 हजार गोळा करण्याचे विरोधकांचे गणित
आमदार महेश शिंदे पुढे म्हणाले, किसन वीर कारखाना अडचणीत आणण्यासाठी हे लोक जीवाचे रान करतील. कारण त्यांच्या निष्ठा बारामतीकरांच्या पायाशी आहेत. जरंडेश्वर आज सहकारातून बारामतीकर भांडवलदारांच्या घशात गेलाय. येथे ऊस कमी पडतोय. मग करायचे काय ? तर चौदा लाख टनाचे क्षेत्र असलेला किसन वीर कारखाना बंद पाडायचा. म्हणजे पाची बोटे तुपात. नेत्यांची मर्जी, लाल दिवा, मदन भोसले यांचा द्वेष सगळचे मनसुबे यशस्वी होतील. असेही विरोधकांचे षडयंत्र आहे. विरोधक आज कारखाना कसा चालवणार ? पैसे कुठुन आणणार असे प्रश्न करीत आहेत. ते स्वतः मात्र कारखाना चालविण्यासाठी पुन्हा 50 हजार सभासद शेतकर्यांकडून 15 हजार रूपये गोळा करणार असल्याचे सांगत आहेत.
जरंडेश्वर चालण्यासाठी किसन वीरचे वाटोळे करण्याचा त्यांचा डाव
आमदार शिंदे आणखी पुढे म्हणाले, डॉ. शालिनीताई पाटील यांनी अनेक वर्ष संघर्ष करून जरंडेश्वर कारखाना उभारला. कोरेगांव तालुक्यात क्रांती केली. तथापि यशवंत विचारांचा पुरस्कार करणार्यांनी हिडीस पद्धतीने व्यक्तिद्वेषातून या कारखान्याचा लिलाव घडवून आणला. हा कारखाना कोणी खरेदी केला, सर्वांना माहित आहे. वसंतराव फाळके यांना सातारारोडची 14 एकर जमीन यापायात विकावी लागली आणि वरून विरोधक असे म्हणातात, हा कारखाना ताईंनी खाल्ला. विरोधकांची ही गोबेल्स निती आहे. रेटुन खोटे बोलणार्यांनी समाजात चुकीचा संदेश दिल्याचे सांगून आमदार शिंदे म्हणाले, जरंडेश्वरच्या 27 हजार सभासदांनी साडेचारशे कोटींवर नेहलेला कारखाना तीन कोटीत कवडीमोलाने खरेदी करण्यात आला. नेमका कारखाना कोणी खाल्ला, हे इथे लक्षात येते. मदन भोसले यांनीही या भांडवलदारांचे चटके सोसले आहेत. जरंडेश्वर चालविण्यासाठी किसन वीरचे वाटोळे करायचे, हे किसन वीरच्या खाजगीकरणाकडे टाकलेले पाऊल आहे. उद्या ऊस लावायचं म्हणलं तर परवागनीसाठी बारामतीकरांकडे पाणी भरावे लागेल, अशा शेलक्या शब्दात आमदार शिंदे यांनी अजित पवार यांचे नाव न घेता समाचार घेतला.
प्रास्ताविक डॉ. रतन भोईटे यांनी केले. कारखान्याचे माजी संचालक विजय चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. आभार नितीन भोईटे यांनी मानले. सभेला सुरेश काटकर, कमलाकर भोईटे, हणमंत मुळीक, सुरेश बोबडे, रमेश शिंगटे, सुधीर सावंत, शरद भोसले, नितीन भोईटे, राजेंद्र धुमाळ, दत्तात्रय धुमाळ, संतोष सोळस्कर, प्रशांत निकम, प्रदिप कदम, वाघोलीसह राऊतवाडी, अनपटवाडी, आसनगांव, सर्कलवाडी, पिंपोड बु, करंजखोप, सोळशी, सोनके, वाठार स्टेशन व परिसरातील शेतकरी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.