राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांच्या विषयी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या संतापजनक वक्तव्याचा राज्याचे माजी सहकार मंत्री व कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. ते म्हणाले, महाराष्ट्राला उच्च सांस्कृतिक परंपरा आहे. महाराष्ट्र हे महिलांचा आदर करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने पुढे जाणारे तसेच स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने वाटचाल करणारे राज्य आहे. या राज्यात अलीकडे राजकीय परिस्थिती बदलून ज्या मार्गाने ही मंडळी सत्तेत आली तो मार्ग महाराष्ट्रातील जनतेला आवडलेला नाही. या मंडळींच्या डोक्यावर 50 खोक्यांचा विषय चिकटून बसलेला आहे व तो काही केल्या निघत नाही. कोणतेही काम त्यांना दाखवता येत नाही. डोक्यावर बसलेला कलंकही पुसता येत नाही. त्यांनी तो कलंक मान्यच केला आहे. त्यामुळे वैफल्यग्रस्त मानसिकतेतून व चिडून अब्दुल सत्तार यांच्यासारखी मंडळी अशी संतापजनक वक्तव्य करत आहेत. अशा प्रकारचे राजकारणी महाराष्ट्राच्या भल्याच्या दृष्टीने राजकारणात राहणे योग्य नाही. त्यांच्या पक्षातील वरिष्ठांनी त्यांना राजकारणातून बाजूला करावे, अशी मागणीही आमदार बाळासाहेब पाटील यांनी केली आहे