कराडला शंभर बेडचे महा जम्बो कोविड सेंटर होणार
ग्रामीण भागातील आरोग्य सुविधेसाठी 1 कोटीचा निधी ः पृथ्वीराज चव्हाण
Published:Jul 17, 2021 11:17 AM | Updated:Jul 17, 2021 11:47 AM
News By : Muktagiri Web Team
कराड ः कोरोनाच्या संभाव्या तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कराडला शंभर बेडचे महा जम्बो कोविड सेंटरला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. 15 ऑगस्ट 2021 पर्यंत हे सेंटर कार्यान्वित होणार असून याठिकाणी सर्व उपचार मोफत केले जाणार आहेत. तसेच कराड दक्षिणेतील ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधा सुधारण्याकरिता आमदार फंडातून 1 कोटी रुपयांचा निधीची तरतूद केली असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अॅड. उदयसिंह पाटील, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, इंद्रजित चव्हाण आदी उपस्थित होते.
आ. चव्हाण म्हणाले, कोरोनाची दुसरी लाट जरी ओसरत असली तरी कोरोना संपलेला नाही. नागरिकांकडून नियमांचे पालन होत नसल्याने तसेच न्यायालयाच्या आदेशामुळे कारखान्याची निवडणूक झाल्याने कारखाना कार्यक्षेत्रातील गावामध्ये रुग्ण वाढत असल्याचे चित्र आहे. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. तर कराड दक्षिणमधील ग्रामीण भागातील वैद्यकीय सुविधा सुधारण्याकरिता सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उंडाळे ग्रामीण रुग्णालय व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड नागरी सुविधा केंद्रांसाठी आमदार फंडातून 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर केली आहे. तसेच कोरोनाच्या संभाव्य तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने कराडला महा जम्बो कोविड सेंटरला मंजूरी दिली असून या ठिकाणी 100 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. 15 ऑगस्टपर्यंत हे सेंटर कार्यान्वित होेणार आहे. या ठिकाणी आरोग्य सुविधा पूर्णपणे मोफत दिली जाणार आहे, असेही आ. चव्हाण यांनी सांगितले.