मध्यावधी निवडणुकांसाठी तयार राहा : शरद पवार
Published:11 m 1 d 6 hrs 52 min 32 sec ago | Updated:11 m 1 d 6 hrs 52 min 32 sec ago
News By : Muktagiri Web Team
मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यातील महाविकासआघाडीचं सरकार कोसळलं. बहुमत नसल्याने उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर लगेचच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापनेचा दावा करत मुख्ममंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ ही घेतली. शिंदे सरकारला उद्या बहुमत सिद्ध करायचं आहे. पण त्याआधीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलंय.
शरद पवार यांनी म्हटलं की, 'शिंदे सरकार जास्त काळ टिकणार नाही. मध्यावधी निवडणुकांसाठी तयार राहा. शिंदे सरकारमध्ये नाराजांची मोठी फौज आहे.' राष्ट्रवादीच्या आज झालेल्या बैठकीत शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण झालं आहे. महाविकासआघाडीचे जनक असलेले शरद पवार यांच्या वक्तव्याचं आता वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक यशवंतराव चव्हाण केंद्रात संपन्न झाली. जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्यात बैठक झाली. लवकरच प्रसारमाध्यमांसमोर विधानसभा विरोधी पक्षाच्या नेत्यांची घोषणा होणार आहे.