‘सावरी’ गावातील मुलं डोंगरात शोधताहेत ‘रेंज’
News By : Muktagiri Web Team
जगात कोरोना महामारीनं थैमान घातल्यामुळं संसर्ग टाळण्यासाठी शासनानं ‘लॉकडाऊन’ जाहीर केलं. त्यामुळं गर्दीची ठिकाणं असलेली शाळा-महाविद्यालयं पूर्णतः ‘लॉक’ झाली. या काळात मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून शासनानं ‘ऑनलाईन शिक्षण’ सुरू केलं. पण हेच शिक्षण ‘सावरी’ या दुर्गम गावातील मुलांसाठी नेटवर्कअभावी गैरसोईचं ठरतंय. त्याच मुलांची ही खडतर कहाणी...
विकी जाधव
सातारा : जगात कोरोना महामारीनं थैमान घातल्यामुळं संसर्ग टाळण्यासाठी शासनानं ‘लॉकडाऊन’ जाहीर केलं. त्यामुळं गर्दीची ठिकाणं असलेली शाळा-महाविद्यालयं पूर्णतः ‘लॉक’ झाली. या काळात मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून शासनानं ‘ऑनलाईन शिक्षण’ सुरू केलं. पण हेच शिक्षण ‘सावरी’ या दुर्गम गावातील मुलांसाठी नेटवर्कअभावी गैरसोईचं ठरतंय. त्याच मुलांची ही खडतर कहाणी...
सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील ‘सावरी’हे तीनशे लोकवस्तीचं दुर्गम गाव. चारही बाजूंनी डोंगररांगांनी हे गाव निसर्ग जैवविविधतेनं परिपूर्ण असलं तरी आधुनिक सुविधांपासून मात्र वंचितच आहे. गावात मोबाईल नेटवर्कची तर वानवा आहेच; तसेच कॉलिंग सुविधाही नाही. तेथे इंटरनेटची गोष्ट तर शेकडो कोस दूरच...अशी सावरी गावची बिकट अवस्था..
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 16 मार्चपासून सर्व शाळा बंद झाल्या अन् सुरू झालं ऑनलाईन शिक्षण. परंतु, हे शिक्षण शहरातील मुलांसाठी सोईचं ठरतंय; पण सावरी या दुर्गम गावात नेटवर्कची वानवा असल्याने येथील तीस विद्यार्थ्यांना चार किलोमीटरची काटेरी वाट तुडवत डोंगरात ‘रेंज’ शोधावी लागत आहे. सावरी गावातील मुलांचं हे दररोजचं चित्र..तसेच या मुलांना जेथे ‘रेंज’ मिळेल तेथेच अभ्यास करावा लागतोय. अशी भयावह परिस्थिती येथील मुलांच्या वाट्याला आलेय..तरीही ‘ती’ ऑनलाईन शिक्षणासाठी धडपडताहेत.
मुळातच ‘रेंज’ची समस्या असल्याने शिक्षकांनी पाठवलेला व्हिडिओ डाऊनलोड करायला एक ते दीड तास लागतो, त्यामुळं तिथंही ‘प्रतीक्षा’च करावी लागले. तसेच काही ठिजाणी विद्यार्थ्यांना उंचवट्याच्या भागावर ‘रेंज’ मिळते; परंतु इंटरनेट जाणे, व्हिडिओ न दिसणे, आवाज जाणे यासारख्या प्रकारामुळे त्यांच्या वेळेचा अपव्यय होत आहे. त्याचबरोबर ही मुलं काटेरी वाट तुडवत जंगलात जातात, परंतु जंगली हिंस्र प्राणी, श्वापदांपासून त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
मुख्यतः सावरी गावातील सर्वच मुलांकडे स्मार्टफोन नसल्याने एका मोबाईलवर तीन ते चार विद्यार्थ्यांना अभ्यास करावा लागतो. ही गरज ओळखून बामणोली शाळेचे उपक्रमशील शिक्षक विजय पवार यांनी स्वत:कडील जुने मोबाईल दुरुस्त करून ते मुलांना दिले आहेत. तसेच बामणोली शाळेचे केंद्रप्रमुख विजय देशमुख मुलांच्या शिक्षणासाठी प्रशासन स्तरावर पाठपुरावा करण्यासाठी कायम तत्पर असतात.
अशाप्रकारे शासनाने ऑनलाईन शिक्षणाचा मार्ग अवलंबला; पण तो मार्ग डोंगर-कपारीत वसलेल्या गावातील मुलांसाठी गैरसोयीचा ठरतोय. यामध्ये ‘सावरी’ गाव हे प्रातिनिधिक उदाहरण असून, नेटवर्कअभावी या गावाप्रमाणेच सातारा जिल्ह्यात डोंगर-कपारीत वसलेल्या अनेक गावांतील मुलांचे शैक्षणिक भवितव्य अधांतरीच आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही..!
तीस विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला..
सावरी गावात विविध इयत्तेत शिकणारे तीस विद्यार्थी असून, लॉकडाऊनमुळे या विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू झाला आहे. मात्र, इंटरनेट नेटवर्क नसल्याचे या विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. तसेच घरापासून दूर असलेल्या जंगलात एखाद्या ठिकाणी नेटवर्क मिळेल, या आशेनं हे विद्यार्थी वणवण भटकत आहेत.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग सुकर करावा...
सावरी गावात नेटवर्कअभावी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असून, याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे. तसेच ‘डिजिटल भारत’ची हाक देणार्या नेतृत्वाने या समस्येची उकल करावी. व येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग कायम सुकर करून त्यांच्या शिक्षणाचा हक्क स्थापित करावा, अशी मागणी पालक-ग्रामस्थांकडून होत आहे.
‘किशोर आप्पां’ची मुलांच्या शिक्षणासाठी तळमळ...
ज्यांच्या बोलण्यातून साधं राहणीमान अन् उच्च विचारसरणीची प्रचिती होते, अशा किशोर शिंदे उर्फ ‘आप्पां’चा गावातील प्रत्येक कार्यक्रमात पुढाकार असतो. ते कायमच मुलांच्या भविष्यकालीन शिक्षणाबाबत सकारात्मक विचार करतात. सध्याच्या ऑनलाईन शिक्षण प्रणालीत सुद्धा ते मुलांचा अभ्यास घेतात. यातूनच त्यांची मुलांच्या शिक्षणाप्रती असलेली तळमळ दिसून येते.
बामणोली केंद्र शाळेच्या माध्यमातून सर्व शिक्षक विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लास घेत आहेत. त्यातच सावरी गावातील काही मुलांकडे स्मार्ट फोन नाहीत. तसेच तेथे रेंजची समस्या असल्याने आमची अडचण होत आहे. याही परिस्थितीत मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच मुलांचा भविष्यातील शिक्षणाचा मार्ग सुकर होण्यासाठी आम्ही जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करणार आहोत.
- दीपक भुजबळ, मुख्याध्यापक, बामणोली केंद्र शाळा, ता. जावळी