जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांचे वरिष्ठ व निवडश्रेणी प्रस्ताव मान्यतेच्या प्रतीक्षेत
News By : Muktagiri Web Team
सातारा जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांचे वरिष्ठ व निवडश्रेणी प्रस्ताव गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहेत. शिक्षकांच्या वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी राज्य शासनाने सुरुवातीचे अनेक जाचक नियम व अटी रद्द करून त्यामध्ये अनेक बदल केलेले आहेत.
अनिल गायकवाड
सातारा : सातारा जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांचे वरिष्ठ व निवडश्रेणी प्रस्ताव गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहेत. शिक्षकांच्या वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी राज्य शासनाने सुरुवातीचे अनेक जाचक नियम व अटी रद्द करून त्यामध्ये अनेक बदल केलेले आहेत. तसेच जे शिक्षक वरिष्ठ व निवड श्रेणीकरिता पात्र झाले आहेत, त्यांना वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी आवश्यक असणारे स्वतंत्र वा विषेश प्रशिक्षण पूर्ण करण्याची आवश्यकता नाही. यासंदर्भातील दि. 23 ऑक्टोबर 2017 व दि. 21 डिसेंबर 2018चे शासन निर्णय महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. शिप्रधो-2019/ प्र. क्र. 43/प्रशिक्षण दि. 26 ऑगस्ट 2019च्या शासन निर्णयानुसार अधिक्रमित करण्यात आलेले आहेत. राज्य शासनाचे असे स्पष्ट निर्देश आणि आदेश असतानाही सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडून जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांचे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रस्ताव गेल्या अनेक महिन्यांपासून मान्यतेच्या प्रतीक्षेत असून, जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या अनिश्चित धोरणामुळे सातारा जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांमधून या अनिश्चित धोरणाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ज्या माध्यमिक शिक्षकांची सेवा 12 वर्षे पूर्ण झालेले असेल आणि त्यांनी शासन नियमानुसार आवश्यक असलेले प्रशिक्षण पूर्ण केले असेल तर अशा शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी आणि ज्या माध्यमिक शिक्षकांची सेवा 24 वर्षे पूर्ण झालेली असेल आणि त्यांनी उच्च शैक्षणिक आहर्ता आणि शासन नियमानुसार आवश्यक असलेले प्रशिक्षण पूर्ण केलेले असेल तर अशा शिक्षकांना निवड श्रेणी मंजूर करण्यात येत होती. परंतु, वरील उल्लेखित दि. 26 ऑगस्ट 2019च्या शासन निर्णयानुसार जे शिक्षक वरिष्ठ व निवड श्रेणीकरिता पात्र झाले आहेत, त्यांना वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी आवश्यक असणारे स्वतंत्र वा विषेश प्रशिक्षण पूर्ण करण्याची आवश्यकता नाही, असे स्पष्ट निर्देश व आदेश राज्यपाल यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव संजय माने यांनी राज्य शासनाच्यावतीने निर्गमित केला आहे. वरील उल्लेखित शासन निर्णयानुसार राज्य शासनाच्यावतीने स्पष्ट निर्देश आणि आदेश असताना पुन्हा हा या आदेशाबाबत शिक्षणाधिकारी पातळीवर शिक्षण उपसंचालक, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर आणि शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडे हा शासन आदेश झाल्यानंतर सुमारे वर्षभराच्या कालावधीनंतर मार्गदर्शन मागवण्याची गरजच काय?, असा प्रश्न जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांमधून उपस्थित केला जात आहे.
याबाबत जिल्ह्यातील जे शिक्षक वरिष्ठ व निवड श्रेणीकरिता पात्र झालेले आहेत आणि ज्यांनी वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण पूर्ण केले आहे, अशा जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांची संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांकडून सुमारे दोन ते अडीच महिन्यांपूर्वी शिक्षणाधिकार्यांच्या एका पत्रान्वये संबंधित शिक्षकांनी प्रशिक्षण पूर्ण केलेली प्रमाणपत्रे कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर माध्यमिक शिक्षण विभागाच्या ई-मेल आयडीवरती मागवून घेण्यात आलेली होती.
दरम्यान, याबाबत सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाशी संपर्क साधला असता दि. 26 ऑगस्ट 2019च्या शासन निर्णयावरती दि. 15/02/2020च्या पत्राने शिक्षण उपसंचालक, कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांना अग्रेषित केलेल्या पत्रामध्ये दि. 23 ऑक्टोंबर 2017 व दि. 21 डिसेंबर 2018 शासन निर्णय अधिक्रमित करण्यात आले असले तरी यापूर्वीचे प्रचलित शासन निर्णयानुसार वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी प्रशिक्षण अनिवार्य आहे का? तसेच कोणतेही सेवांतर्गत प्रशिक्षण न घेतलेल्या शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी देता येईल किंवा कसे? याबाबत मार्गदर्शनाची आवश्यकता असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सदर प्रकरणी मार्गदर्शन मिळाल्यानंतर वरिष्ठ व निवड श्रेणी पात्र शिक्षकांची यादी जाहीर करणे सुलभ होईल, असेही या पत्रांमध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे. या पत्राच्या प्रती अपर मुख्य सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई, संजय माने, अवर सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई, शिक्षण संचालक, (माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण) शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना पाठवण्यात आल्या आहेत.
याबाबत शिक्षण उपसंचालक, कोल्हापूर विभाग यांच्या पत्रान्वये जिल्ह्यातील ज्या शिक्षकांची सेवा 12 वर्षे पूर्ण झालेली आहे, अशा शिक्षकांना वरिष्ठश्रेणी वेतन निश्चितीसह देण्याबाबतचे अधिकार लेखाधिकारी यांना देण्यात आलेले आहेत. परंतु, दि. 26 ऑगस्ट 2019च्या शासन आदेशान्वये ज्या शिक्षकांची सेवेची 12 वर्षे पूर्ण झालेली आहे, अशा शिक्षकांची विना अट यादी जाहीर करण्याबाबत शिक्षणाधिकार्यांना आदेशित केलेले आहे. मुख्याध्यापक संघाने वेळोवेळी संघाच्या मीटिंगमध्ये या विषयाबाबत शिक्षणाधिकारी यांच्याशी चर्चा केलेली होती. गोपनीय अहवालासह एक-दोन महत्त्वाची कागदपत्रे मागवून घेऊन यादी तत्काळ जाहीर होईल, असे आश्वासन शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी जिल्हा मुख्याध्यापक संघाला दिले होते. तरीदेखील गेले किती दिवस हा विषय मुद्दाम प्रलंबित ठेवला जातोय. तरी शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी व्यक्तिशः लक्ष घालून ऑगस्ट महिन्याअखेर पर्यंत वरिष्ठ वेतन श्रेणी शिक्षकांची यादी घोषित करण्याची मागणी सातारा जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सचिन नलवडे यांनी एका लेखी निवेदनाद्वारे माध्यमिक शिक्षणाधिकार्यांकडे दि. 25 ऑगस्ट 2019च्या पत्राने समक्ष भेटून केलेली होती.
याबाबत दि. 26 ऑगस्ट 2019च्या शासन निर्णयानुसार सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातर्फे ज्या माध्यमिक शिक्षकांची सेवा 12 वर्षे व 24 वर्षे पूर्ण झालेली आहे, अशा शिक्षकांची यादी विनाविलंब जाहीर करण्याची मागणी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सचिन नलवडे आणि जिल्ह्यातील वरिष्ठ व निवड श्रेणी मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेकडो माध्यमिक शिक्षक बंधू-भगिनींनी केलेली आहे. याबाबत आमच्या प्रतिनिधीने कोल्हापूर विभागाचे शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनावणे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता माध्यमिक शिक्षकांचे वरिष्ठ व निवड श्रेणीबाबत दि. 26 ऑगस्ट, 2019 च्या शासन निर्णयांमध्ये राज्य शासनाने स्पष्ट निर्देश दिलेले असताना या शासन निर्णयाच्या अधीन राहून ज्या-त्या जिल्ह्याच्या शिक्षणाधिकार्यांनी माध्यमिक शिक्षकांचे वरिष्ठ व निवड श्रेणीबाबत त्वरित उचित कार्यवाही करणे आवश्यक आहे. त्याबाबत शिक्षण उपसंचालक कार्यालय स्तरावर वेगळे मार्गदर्शन मागण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट करून शिक्षण उपसंचालक सोनावणे म्हणाले, ‘जर दि. 26 ऑगस्ट, 2019च्या शासन निर्णयानुसार माध्यमिक शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी देणेबाबत शिक्षणाधिकार्यांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे मार्गदर्शन मागविले असल्यास आम्ही दि. 26 ऑगस्ट, 2019 च्या शासन निर्णयाला अधीन राहून माध्यमिक शिक्षकांचे वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रस्तावास मंजुरी देऊन तशा प्रकारची यादी प्रसिद्ध करण्याचे निर्देश या मार्गदर्शनामध्ये देणार असल्याचे स्पष्ट केले.’