दुष्काळी तालुका म्हणून ओळखल्या जाणार्या खटाव तालुक्यातील वडूज लगत असलेल्या शेतात येथील युवा शेतकरी महेश उर्फ बबलू पवार यांनी 36 गुंठ्यात मिरचीच्या लागवडीतून आतापर्यंत केलेल्या तोडीत 5 लाखांच्यावर उत्पन्न मिळवले आहे. खर्च वजा जाता पाचव्या तोड्यातच 5 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले तर अजूनही 5 ते सहा लाखांच्या उत्पन्नाची अपेक्षा शेतकरी बबलू पवार यांनी व्यक्त केली आहे.
आकाश यादव
वडूज : दुष्काळी तालुका म्हणून ओळखल्या जाणार्या खटाव तालुक्यातील वडूज लगत असलेल्या शेतात येथील युवा शेतकरी महेश उर्फ बबलू पवार यांनी 36 गुंठ्यात मिरचीच्या लागवडीतून आतापर्यंत केलेल्या तोडीत 5 लाखांच्यावर उत्पन्न मिळवले आहे. खर्च वजा जाता पाचव्या तोड्यातच 5 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले तर अजूनही 5 ते सहा लाखांच्या उत्पन्नाची अपेक्षा शेतकरी बबलू पवार यांनी व्यक्त केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, येथील युवा शेतकरी महेश उर्फ बबलू पवार यांची वडूज अंबवडे रस्त्यावर शेतजमीन आहे. या जमिनीत त्यांनी द्राक्ष, केळी या फळबागासह पारंपरिक पिके घेतली आहे. खटाव या दुष्काळी तालुक्याला अनेकदा कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाने प्रचंड तोटा सहन करावा लागला. यामुळे शेती करत असताना उत्पादन खर्चही हाती येत नसल्याने त्यांनी मिरची लागवड करायचे ठरवले. त्यानंतर त्यांनी काही शेतकरी मित्रांना सोबत घेऊन गट शेती करण्याचा निर्णय घेतला. आणि या निर्णयातून त्यांनी किसान क्रांती हायटेक ग्रुप निर्माण केला. आणि यामध्ये 22 जणांना एकत्र करून 18 ते वीस एकर क्षेत्रात मिरचीची लागवड केली.
पवार यांनी ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्यांनी बारामती येथील नुनेमन्सक येथून ‘बायर इंदू’ व ‘आरमार’ या वाणाचे बियाणे आणून आपल्या ‘कृनाल नर्सरी’मध्ये तयार केली. त्यानंतर ही रोपे आपल्या गटातील शेतकर्यांना दिली. साधारण 22 शेतकर्यांनी या रोपांची 18 एकरमध्ये लागवड केली. यामध्ये वडूज, पिंपळवाडी, गणेशवाडी, कातरखटाव, डाभेवाडी, मानेवाडी आदी ठिकाणी ही लागवड करण्यात आली.
यासाठी पवार यांनी एकरी आठ हजार रोपे लागण करून त्या आधी एकरी सहा ट्रॉली शेणखत, दोन ट्रॉली कोंबडी खत, तसेच भेसळ डोस देण्यात आले. त्यानंतर पाच फूट अंतरावर बेड तयार केले. त्यावर मल्चिंग पेपर अंथरूण त्यानंतर दीड फुटावर त्याची लागण केली. त्यानंतर या रोपांना ठिबकच्या साह्याने पाणी देण्याची सुविधा केली. साधारण 55 दिवसांतच या मिरचीचा पहिला तोडा झाला. यासाठी नांगरणी, कुरपणे, भांगलणे, तार, ठिबक, काठी, तार, बांधणी शेणखत, रासायनिक खत असा दीड लाख रुपये खर्च आला.
आतापर्यंत नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या चार महिन्यांत सरासरी त्यांना 5 लाखांचे उत्पन्न मिळाले. यासाठी त्यांना ध्यास पर्व अॅग्रो सर्व्हिसेसचे वांगी (ता. कडेगाव) येथील सतीश सूर्यवंशी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तर किसान क्रांती हायटेक ग्रुपच्या बॅनरखाली हा मिरचीचा माल त्यांनी कराड, सातारा, आदी ठिकाणी व्यापार्यांना विक्री केला. मिरचीचा रंग आकर्षक असल्याने त्यांना सध्या 40 ते 50 रुपये प्रतिकिलो दर मिळत असल्याने सर्व खर्च वजा जाता आतापर्यंत 5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न त्यांना मिळाले आहे. शेवटच्या तोडणीअखेर 5 लाखाचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा बबलू पवार यांनी व्यक्त केली आहे.
त्याचप्रमाणे याच गटातील कातरखटाव येथील शेतकरी छगन बागल यांच्या सूनबाई रोहिणी बागल यांच्या कुटुंबाने 50 गुंठे क्षेत्रात आरमार जातीचे वाण लावून आतापर्यंत 8 लाखांचे उत्पन्न मिळवले आहे. यासाठी त्यांना अडीच लाखांचा खर्च आला आहे. विशेषतः तालुक्यातील शेतकर्यांनी आवर्जून या ठिकाणच्या मिरची लागवड क्षेत्राला भेट देऊन माहिती घेण्याची गरज आहे. बबलू पवार यांनी आपल्या गट शेती माध्यमातून इतर शेतकर्यांना मिरची या पिकाच्या माध्यमातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवून दिल्याने परिसरात शेती उत्पन्नात अलौकिक ठसा उमटविला आहे.
युवा शेतकरी महेश उर्फ बबलू पवार यांनी स्थापन केलेल्या किसान ‘क्रांती हायटेक अॅग्रो’ या ग्रुपमध्ये डॉ. संतोष गोडसे, संजय काळे, भरत घनवट, सतीश गोडसे, सुनील सजगणे, मंगेश गोडसे, महादेव कोकरे, दत्तात्रय राऊत, तुकाराम राऊत, शिवाजी नलवडे, रोहिणी बागल, विजय गोडसे आदी प्रमुख शेतकर्यांचा समावेश आहे. यांनी या माध्यमातून सध्या आधुनिक पद्धतीने मिरची लागवड करून लाखो रुपयांचे उत्पन्न घेत आहेत.
नवनवीन प्रयोगातून भरपूर अनुभव आला. कुठल्या पिकाला कोणती खते, कोणत्या वेळी कोणती सूक्ष्म पोषकद्रव्यांची गरज असते, याची माहिती असल्याने उत्पादनातही भरपूर वाढ झाली. आधुनिक पद्धतीने शेती केल्यास कमी खर्चात, कमी पाण्यात चांगले उत्पन्न मिळवू शकतो.
- महेश उर्फ बबलू पवार, शेतकरी, वडूज.