खटाव तालुक्यातील येरळा नदी पात्रात अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणार्यावर स्वतः खटाव तहसीलदार आणि पथक यांनी गेल्या दोन दिवसांपासून कारवाईचा धडाका लावला आहे. गेल्या दोन दिवसांत विविध ठिकाणी केलेल्या वाळू कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल तहसीलदार किरण जमदाडे यांनी ताब्यात घेतला आहे. तर स्वतः तहसीलदार हे कारवाईत सहभागी होत असल्याने आता अवैध वाळू वाहतुकीला आळा बसणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
आकाश यादव
वडूज, दि. 2 : खटाव तालुक्यातील येरळा नदी पात्रात अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणार्यावर स्वतः खटाव तहसीलदार आणि पथक यांनी गेल्या दोन दिवसांपासून कारवाईचा धडाका लावला आहे. गेल्या दोन दिवसांत विविध ठिकाणी केलेल्या वाळू कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल तहसीलदार किरण जमदाडे यांनी ताब्यात घेतला आहे. तर स्वतः तहसीलदार हे कारवाईत सहभागी होत असल्याने आता अवैध वाळू वाहतुकीला आळा बसणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, खटाव तालुक्यातील येरळा नदी पात्र हे वाळू उपशाने ओसाड करून टाकले आहे. नदीपात्रात मोठं मोठे खड्डे पडल्याने निसर्गप्रेमी संताप व्यक्त करत आहेत. तर तालुक्यातील अंबवडे, भुरकवडी, नढवळ, मायणी परिसर हा वाळू चोरांची हक्काची ठिकाणे बनली आहेत. मात्र, आता खटावचे कार्यक्षम तहसीलदार किरण जमदाडे यांनी स्वतः या विषयाकडे गंभीर्याने लक्ष दिल्याने गेल्या दोन दिवसांत अनेक ठिकाणी अवैध वाळू उपसा, गौण खनिज उत्खनन, वाहतूक करणार्या गाड्या पकडल्या. अचानक तहसीलदार यांचे हे पथक सतर्क झाल्याने आता वाळू चोरांवर तहसीलदार किरण जमदाडे हे कर्दनकाळ ठरत आहेत.
दि. 26 फेब्रुवारी ला तहसीलदार यांच्या पथकातील मंडलाधिकारी भोसले, तलाठी परदेशी व कोतवाल यांनी मायणी याठिकाणी अवैध गौनखनिज उत्खनन करणारी तीन ट्रॅक्टर पकडून कारवाई केली. तर त्याच रात्री सिद्धेश्वर कुरोली याठिकाणी रात्रीच्या सुमारास अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर मंडलाधिकारी चक्के, तलाठी ढोके, परदेशी, मदे, कांबळे, राजमाने यांनी ताब्यात घेतला व संबंधित वाहन वडूज पोलीस ठाण्यात जमा केले.
दरम्यान, 28 फेब्रुवारीला रात्रीच्या 2:30 वाजण्याच्या सुमारास मायणी परिसरात या पथकातील कातरखटाव मंडलाधिकारी, तलाठी, मायणी तलाठी यांनी छापा टाकून अवैध वाळू उत्खनन करणारा जेसीबी, एक डंपर ताब्यात घेऊन मोठी धाडसी कारवाई केली. एवढ्यावरच न थांबता स्वतः तहसीलदार जमदाडे हे सुद्धा रात्री अपरात्री पथकात सहभागी होऊन कारवाया करण्यास जात आहेत. तर दि. 1 मार्चला रात्रीच्या सुमारास चितळीकडून अवैध वाळूचे वाहन जाणार असल्याची गोपनीय माहिती जमदाडे यांना समजली. माहितीच्या आधारे तहसीलदार जमदाडे, वडूजचे तलाठी सुनील सत्रे, किशोर घनवट, तडवळेकर, चव्हाण, राजमाने, परदेशी हे खासगी वाहनाने त्याठिकाणी पोहोचले व याठिकाणी त्यांना अवैध वाळू वाहतूक करणारे पिकअप वाहन मिळून आले. संबंधित वाहन हे औंध पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे.
निवडणूक कामकाजात व्यस्त राहिल्याने अवैध गौण खनिज विषयाकडे जास्त लक्ष देता आले नाही. मात्र, आता तालुक्यात अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक होऊ दिली जाणार नाही असा पवित्रा तहसीलदार जमदाडे यांनी घेतला आहे. त्यामुळे आता तालुक्यात अवैध वाळू उपसा करणार्यांवर निश्चित वचक बसला जाईल, अशी अपेक्षा अनेकजण व्यक्त करत आहेत.
पथकाची रात्री रोज तालुक्यात गस्त..
तहसीलदार किरण जमदाडे यांनी अवैध वाळू वाहतूक व उत्खनन करणार्यांसाठी एक स्वतंत्र पथक स्थापन केले आहे. हे पथक एका खाजगी वाहनातून तालुक्यात रात्री अपरात्री गस्त घालत आहे. त्यामुळे आता तालुक्यात अवैध वाळू चोरांना चाप बसेल.