युद्धाला तोंड फुटताच जसे आघाडीवरील सैन्य शत्रूला भिडते तसेच गेले वर्षभर सुरू असलेल्या कोरोना युद्धात अगदी फ्रंटवर बिनीची फौज बनून कोण लढलं असेल तर पीपीई कीट घालून कोविड रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर्स आणि त्यांचे सहकारी. सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयातील अनेक पुरुष सहकार्यांच्या खांद्याला खांदा लावून अनेक महिला डॉक्टर्स, नर्सेस, टेक्निशियन, परिचारिका, वर्ग-4 कर्मचारी यांनी धोका पत्करून ही लढाई लढताना अनेक कोविड रुग्णांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं आहे.
दीपक देशमुख
सातारा, दि. 7 : युद्धाला तोंड फुटताच जसे आघाडीवरील सैन्य शत्रूला भिडते तसेच गेले वर्षभर सुरू असलेल्या कोरोना युद्धात अगदी फ्रंटवर बिनीची फौज बनून कोण लढलं असेल तर पीपीई कीट घालून कोविड रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर्स आणि त्यांचे सहकारी. सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयातील अनेक पुरुष सहकार्यांच्या खांद्याला खांदा लावून अनेक महिला डॉक्टर्स, नर्सेस, टेक्निशियन, परिचारिका, वर्ग-4 कर्मचारी यांनी धोका पत्करून ही लढाई लढताना अनेक कोविड रुग्णांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं आहे.
गेल्या वर्षाच्या जानेवारीत देशात कोरोनाचा शिरकाव झाला. यानंतर हळूहळू कोरोनाचे संपूर्ण देशभरात रुग्ण सापडू लागले. सातारा जिल्ह्यातही रुग्णांच्या संख्येत भर पडू लागली व दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत होती. कोरोनावर नेमके औषध आणि प्रभावी लस याकडे सर्वांचे लक्ष लागले होते तर दुसरीकडे रुग्णांची संख्या वाढू लागली होती. अशा रुग्णांवर उपचार करण्याचे मोठे आव्हान वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स व त्यांचे सहकारी यांच्यासमोर होते. सातारा जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स, परिचारिका, वर्ग 4 मधील सर्व स्टाफ, टेक्निशियन, एक्स-रे विभागातील कर्मचारी वर्ग अशा सर्वच जणांनी जीवाची पर्वा न करता रुग्णसेवेत झोकून दिले.
एरवी जिल्हा शासकीय रुग्णालयात संपूर्ण जिल्ह्यातून विविध आजार, घात-अपघातातील जखमी असे रुग्ण येतच असतात. त्यातच ही नवीन मोठी जबाबदारी पडली होती. एकतर त्या काळात कोरोनाबाबत संशोधन प्राथमिक अवस्थेत होते. त्याची लक्षणे, निदान लगेच होत नव्हते. अशा बिकट परिस्थितीत वैद्यकीय क्षेत्रासमोर मोठे आव्हान उभे राहिले होते.
संपूर्ण प्रशासन कोरोना नियंत्रणासाठी अहोरात्र परिश्रम घेत होते. यावेळी जिल्हा रुग्णालयातील स्टाफनेही थेट कोरोना रुग्णाच्या संपर्कात येऊन त्याच्यावर उपचार व रुग्णांची सेवासुश्रूषा केली. पुरुष सहकार्यांच्या खांद्याला खांदा लावून महिला स्टाफनेही धोका पत्करून या कोरोना युद्धात बिनीच्या शिलेदारांची भूमिका बजावली आहे. 15 दिवसांच्या रोटेशननुसार कर्मचारी वर्ग कोरोना ड्युटीवर हजर व्हायचा.
या काळात घरची जबाबदारी सांभाळून, कुटुंबाची आणि स्वतःच्या सुरक्षेबाबत योग्य ती काळजी घेऊन आपले रुग्णसेवेचे कर्तव्य बजावत अनेक रुग्णांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. यावेळी बरे झालेल्या संबंधित रुग्णाच्या नातेवाइकांच्या चेहर्यावरील आनंद पाहून केलेल्या रुग्णसेवेचे सार्थक झाल्याचे नर्सिंग स्टाफने आवर्जून सांगितले. मध्यंतरी कोरोना रुग्णवाढीचा वेग कमी होऊ लागला तरीही कोरोना पुन्हा डोके वर काढू लागला आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहनही महिला कर्मचार्यांनी केले आहे.
कोविड 19 हे संपूर्ण जगावर आलेले संकट असताना प्राणाची पर्वा न करता मुकाबला करणार्या महिला कोविड योद्ध्यांना ‘जागतिक महिला दिना’निमित्त सलाम...!