गतवर्षी 5 वर्षांतून ब्रिटिशकालीन तलाव हा ऑक्टोबरमध्ये भरून वाहू लागला होता. यंदा हा तलाव ऑगस्ट महिनाअखेरच भरल्याने या भागातील शेतकरी वर्ग आनंदला असून गावाच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न आता मार्गी लागणार आहे. याबरोबर यंदा वनविभाग स्थानिक संघटना, संस्था यांना सोबत घेऊन पक्षी व वन संवर्धनचे काम हाती घेणार असून, यामुळे या कामास गती प्राप्त होणार आहे. तसेच तलाव ओसंडून वाहू लागल्याने चांद नदीच्या प्रवाहात वाढ होऊ लागली आहे.
स्वप्नील कांबळे
मायणी : गतवर्षी 5 वर्षांतून ब्रिटिशकालीन तलाव हा ऑक्टोबरमध्ये भरून वाहू लागला होता. यंदा हा तलाव ऑगस्ट महिनाअखेरच भरल्याने या भागातील शेतकरी वर्ग आनंदला असून गावाच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न आता मार्गी लागणार आहे. याबरोबर यंदा वनविभाग स्थानिक संघटना, संस्था यांना सोबत घेऊन पक्षी व वन संवर्धनचे काम हाती घेणार असून, यामुळे या कामास गती प्राप्त होणार आहे. तसेच तलाव ओसंडून वाहू लागल्याने चांद नदीच्या प्रवाहात वाढ होऊ लागली आहे.
दरवर्षी सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस होतो. यामुळे महापूरचे वातावरण निर्माण होते; पण खटाव-माण या दुष्काळी भागातील तलाव भरण्यास ऑक्टोबर-नोव्हेंबर महिने उजाडत. यंदा याला अपवाद ठरत ना महापूर, ना सलग लागून राहिलेली संततधार तरीही सर्वत्र झालेली जलसंधारणाची कामे यामुळे गतवर्षीच्या पाणीसाठा सर्वत्र थोड्याफार प्रमाणात टिकून होता, त्यात सातत्याने जोरदार नाही परंतु हलक्या सरी पडत राहिल्याने यंदा मायणीचा तलाव ऑगस्ट महिन्यातच ओसंडून वाहू लागला आहे.
मायणी ब्रिटिशकालीन तलावात कलेढोण, पाचवड, विखळे, भिकवडी, कान्हारवाडी, पडळ या परिसरामधून पाणी येत असते. तरी यावर्षी अद्याप कानकात्रे तलाव ओसंडला नाही. तरीही मायणी तलावामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक वाढल्याने तलावाच्या सांडव्या वरून पाणी वाहू लागले आहे. काही वर्षांपूर्वी चांद नदीचा गाळ काढून पात्र रुंदावल्यामुळे आणि ठिकठिकाणी बांधलेले माती व सिमेंट बंधारे पाण्याने ओव्हरफ्लो भरून वाहू लागल्याने मायणीसह शेडगेवाडी, चितळी गावासही याचा फायदा होणार आहे.
शेती पाण्याचा प्रश्न मार्गी
मायणी ब्रिटिशकालीन तलाव कालव्याच्या व चांद नदीच्या लाभक्षेत्रात हजारो एकर शेतीक्षेत्र आहे. यंदा तलाव वेळेत भरल्याने मायणी, शेडगेवाडी, चितळी या गावांतील शेतकर्यांना याचा मोठा फायदा होणार असून, शेती पाण्याचा मायणी पूर्व-दक्षिणकडील प्रश्न मार्गी लागल्याने शेतकरी सुखावला आहे.
कोरोनामुळे पर्यटकांची तलावाकडे पाठ
गतवर्षी तलाव ओव्हरफ्लो झाल्यानंतर पाच वर्षांनंतर भरलेला तलाव पाहण्यासाठी मायणीसह पंचक्रोशीतील पर्यटकांनी धाव घेत सांडव्यासोबत सेल्फी काढण्यासाठी झुंबड उडवली होती. परंतु, यंदा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या मायणीत जनता कर्फ्यू लागू असून, लोकांच्या मनात असलेल्या भीतीमुळे लोकांनी घराबाहेरच न पडण्याचा निर्णय घेत तलावाकडे पाठ फिरवल्याने यंदा तलाव परिसर निर्मनुष्य असलेला पाहायला मिळत आहे.
सातारा जिल्ह्याच्या नैसर्गिक व ऐतिहासिक सौंदर्यात भर टाकणारा दुष्काळी भागातील ठेवा म्हणजे मायणी पक्षी आश्रयस्थान व ब्रिटिशकालीन तलाव. यंदा स्थानिक युवकांनी गावातील संघटना, सामाजिक संस्था यांना एकत्र करीत मुख्य जुनी बाग, जुनी रोपवाटिका याचे नूतनीकरण करण्याचे काम हाती घेतले. याची दखल मुख्य वन संरक्षक यांनी या अभयारण्याची भेट घेऊन राखीव संवर्धन क्षेत्राचा दर्जा देण्याचे मान्य करून मायणीकरांच्या सौंदर्यात भर घालण्याचे काम केले आहे. हा ठेवा मायणीकर नक्की जपतील. तलावाच्या कामास सर्वांनी मिळून आपले योगदान देऊन आपल्या मायणीचा अभिमान जपण्याचा प्रयत्न करावा.
- शिवाजी कणसे, व्यावसायिक, मायणी