आधुनिक काळात काही जुन्या गोष्टी लुप्त पावत चालल्या आहेत. मात्र, मायेची ऊब देणारी गोधडीची ऊब काही कमी झाली नाही. माणदेशी गोधडीला पुन्हा एकदा प्रतिष्ठा मिळवून दिली आहे दहिवडी येथील चंद्रिका नवगण किशोर यांनी. चंद्रिका यांच्या अनेक उत्पादनाला जगभरातून मागणी होत आहे.
आकाश दडस
बिदाल : आधुनिक काळात काही जुन्या गोष्टी लुप्त पावत चालल्या आहेत. मात्र, मायेची ऊब देणारी गोधडीची ऊब काही कमी झाली नाही. माणदेशी गोधडीला पुन्हा एकदा प्रतिष्ठा मिळवून दिली आहे दहिवडी येथील चंद्रिका नवगण किशोर यांनी. चंद्रिका यांच्या अनेक उत्पादनाला जगभरातून मागणी होत आहे.
गोधडी म्हणजे घरातील आजी-आईच्या जुन्या साड्यांची सुती कापडाचे एकत्र करून जन्माला आलेली उबदार कलाकृती आजही गावांमध्ये शेतातील बायका एकत्र येऊन कुटुंबासाठी, आपल्या घरासाठी, लहान बाळासाठी सुती कापड्याच्या गोधड्या शिवतात; मात्र शहरांमध्ये याचे प्रमाण कमी झालेले आहे.
गोधडी सोबतची ‘चंची’ म्हणजे जुन्या काळात बायका कमरेला एक छोटा रंगीबेरंगी तुकड्याच्या कपड्याने जोडलेली पिशवी लावायच्या. तंबाखू, सुपारी पान, मिशरीची डबी, पैसे असे बरेच काही ठेवत, ही ‘चंची’ पुन्हा नव्याने लोकांना आवडायला लागलेली आहे.
अगोदर ‘याद्रा’ प्रोडक्शनची उत्पादने माण तालुक्यातील दहिवडी येथून केले जात होते; मात्र पुणे, मुंबई आणि भारतभरात तसेच भारताबाहेरील बाजारपेठेमध्ये मागणी वाढल्याने वितरण करणे अवघड जात असल्याने पुण्यातून प्रोडक्शन सुरू केले. पुण्यामध्ये गोधडी कार्यशाळेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो. महिला यामध्ये सहभागी होत आहेत. आणि प्रॉडक्टची मागणी वाढत आहे. ज्यात चंची, गोधडी, खण तोरण, ब्लॉक प्रिंटेड पडदे, कुशन कव्हर, टेबल रनर, वॉल हँगिंग तसेच लहान मुलांकरिता खास कापडी खेळणी तीही जुन्या आठवणीतील कापडी बाहुली पासून अनेक प्राणी खेळण्यांमध्ये उपलब्ध करून दिलेत.
अखेर व्यवसाय कोणताही असो त्यासाठी रात्रंदिवस कष्ट करायचे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून जीवनात खूप चढ-उतार येतात अशा लोकांना. विरोध सहन करण्याची शक्ती आपल्याकडे असणे गरजेचे आहे, जे आपल्या कामाची निंदा करत असतात तेच लोक मार्केटिंग करतात. चंद्रिका यांनी पारंपरिकतेला आधुनिक मार्केटिंगची जोड दिली. पुण्यामध्ये वेगवेगळ्या प्रदर्शनांमध्ये सहभागी होऊन प्रॉडक्टची माहिती दिली जाते व माहिती घेतली जाते.
सध्या व्यवसायाला आधुनिक मार्केटिंगचे जोड असणे आवश्यक आहे. ‘याद्रा क्विल्ट’ या नावाने फेसबुक पेज सुद्धा सुरू केले असून, इन्स्टाग्रामवर या कामाचे फोटो अपलोड केलेले आहेत. ‘याद्रा क्विल्ट’ या संस्थेच्या उत्पादनाला जागतिक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे.
- चंद्रिका नवगण किशोर, संस्थापक संचालक, याद्रा क्विल्ट