‘ती’ सध्या काय करते?, असा प्रश्न आता विचारायची गरज नाही. कारण, शिक्षणाची गंगा खेडोपाड्यापर्यंत पोहोचल्यानंतर अन् महिलांना ती दारे खुली झाल्यापासून ‘ती’ आता सक्षम झालीय. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ती आज प्रत्येक क्षेत्रात काम करताना दिसतेय. प्रामुख्याने ग्रामीण भागातील मुलीही यात कुठे मागे दिसत नाहीत. अन् याचं उत्तम उदाहरण म्हणजे बांबवडेच्या ‘तेजस्वी’नं ‘पॅरा मिलिटरी’त पहिल्याच प्रयत्नात मारलेली उत्तुंग भरारी...त्याच ‘तेजस्वी’च्या कहाणीचा आज 8 मार्च ‘जागतिक महिला दिना’निमित्त घेतलेला हा अ
विकी जाधव
सातारा : ‘ती’ सध्या काय करते?, असा प्रश्न आता विचारायची गरज नाही. कारण, शिक्षणाची गंगा खेडोपाड्यापर्यंत पोहोचल्यानंतर अन् महिलांना ती दारे खुली झाल्यापासून ‘ती’ आता सक्षम झालीय. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ती आज प्रत्येक क्षेत्रात काम करताना दिसतेय. प्रामुख्याने ग्रामीण भागातील मुलीही यात कुठे मागे दिसत नाहीत. अन् याचं उत्तम उदाहरण म्हणजे बांबवडेच्या ‘तेजस्वी’नं ‘पॅरा मिलिटरी’त पहिल्याच प्रयत्नात मारलेली उत्तुंग भरारी...त्याच ‘तेजस्वी’च्या कहाणीचा आज 8 मार्च ‘जागतिक महिला दिना’निमित्त घेतलेला हा अल्पसा धांडोळा..
पाटण तालुक्यातील बांबवडे गावातील एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात 14 मे 1998 रोजी ‘तेजस्वी’चा जन्म झाला. वडील शेतकरी तर आई गृहिणी. ‘तेजस्वी’नं प्राथमिक शिक्षणाचे धडे बांबवडेच्या महात्मा फुले हायस्कूलमध्ये गिरवले तर 11 व 12वीचं शिक्षण तिने तारळेच्या छत्रपती ज्युनिअर कॉलेजमध्ये घेतले. पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी ‘ती’ सातार्यात आली अन् धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयातून तिने बी.कॉम.च्या पदवीसह ‘एनसीसी’च्या पहिल्या बॅचचेही प्रशिक्षण पूर्ण केले.
‘पॅरा मिलिटरी’त भरती होण्याचं स्वप्न लहानपणीच उराशी बाळगलेल्या तेजस्वी पवारनं दहावीत असल्यापासून एमपीएससीच्या माध्यमातून अभ्यास करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे तिला ‘पॅरा मिलिटरी’च्या परीक्षेबद्दल परिपूर्ण माहिती मिळत गेली. त्यातच तिने पदवीचं शिक्षण पूर्ण करत एनसीसीही जॉईन केल्याने ‘पॅरा मिलिटरी’च्या ज्या मूळ संकल्पना/कन्सेप्ट असतात त्याची पायाभरणी ‘एनसीसी’ कॅम्पमधून होत गेली. यातूनच तिचं ‘पॅरा मिलिटरी’च स्वप्न हळूहळू फुलत गेलं.
दरम्यानच्या काळात तिने अभ्यासात तसूभरही खंड पडू दिला नाही. काही कालावधीनंतर फेब्रुवारी 2019 मध्ये ‘आसाम रायफल्स’तर्फे घेण्यात आलेल्या ‘पॅरा मिलिटरी’च्या परीक्षेला ती धैर्यानं सामोरं गेली. साधारणतः 21 जानेवारी 2021 रोजी त्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्या परीक्षेत ती प्रथम श्रेणीत उत्तीर्ण ही झाली. हा निकाल पाहताच तेजस्वीचा आनंद गननात मावेनासा झाला होता. या निकालानं खर्या अर्थानं तेजस्वीच्या कष्टाचं सार्थक झालं. तिनं या निकालाची वार्ता आई-वडिलांना सांगताच त्यांच्याही डोळ्यातून आनंदाश्रू तरळू लागले.
आता ती ‘पॅरा मिलिटरी’च्या ट्रेनिंगसाठी आसामला रवाना होणार असून, ‘पॅरा मिलिटरी’ म्हणजे निमलष्करी दलात निवड झालेली बांबवडे गावातील ती एकमेव मुलगी आहे. तिच्या या उत्तुंग यशाने बांबवडेच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे.
मुळातच ग्रामीण भागातील मुलीने जिद्द, चिकाटी अन् मेहनत ही त्रिसूत्री अवलंबून आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवली तर ती मुलगीही किती उंच भरारी घेऊ शकते, असं तेजस्वी आवर्जून सांगते. त्यामुळे ‘तेजस्वी’चं हे यश इतर मुलींसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ‘तेजस्वी’नं भावी आयुष्यात देखील निमलष्करी दलातील सर्वोच्च पदापर्यंत मजल मारावी, याच तिला आजच्या ‘जागतिक महिला दिना’निमित्त खूप-खूप रूपेरी शुभेच्छा...!
स्वप्न पूर्ण झाल्याचा मनस्वी आनंद वाटतो...
खरंतर पॅरा मिलिटरीत भरती होण्याचं स्वप्न मी लहानपणीच रंगवलं होतं. त्या स्वप्नाला गवसणी घालण्याच्या दृष्टीनं तशी मेहनतही घेतली. अन् कायम सकारात्मक विचार करत प्रयत्न करत राहिले. यात आई-वडील व शिक्षकांचे योगदान मोलाचे असून, त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी माझ्या स्वप्नाला गवसणी घालू शकले. त्यामुळे स्वप्न पूर्ण झाल्याचा मनस्वी आनंद व समाधानही वाटते.
- तेजस्वी सुरेश पवार, बांबवडे, ता. पाटण.
लेकीनं कष्टाचं चीज केलं...
खरंच माझी लेक लहानपणापासूनच हुशार, मायाळू अन् समाधानी. घरची परिस्थिती हलाखीची असूनही तिनं कधी आमच्याकडे मोठमोठ्या गोष्टींसाठी रडगाणं गायलं नाही. आहे त्यात समाधान मानून ती अभ्यास करत राहिली. खरं सांगायचं म्हटलं लेकीनं आम्ही केलेल्या कष्टाची जाणीव ठेवून घरचं अन् गावचं नाव मोठं केलंय, याच्यासारखा दुसरा आनंद कोणताच नाही..
- सुरेश व प्रमिला पवार, तेजस्वीचे आई-वडील.