दरवर्षी मायणी, येरळवाडी, सूर्याचीवाडी, कानकात्रे या तलावात नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात अनेक देशी-विदेशी पक्षी आपली उपस्थिती लावतात. यावर्षी पक्षांचे आगमन लांबले आहे. वरील चार तलावांपैकी मायणी-कातरखटाव रस्त्यालगत सूर्याचीवाडी गावच्या हद्दीतील तलावात येणार्या अनेक परदेशी पक्ष्यांत बार-हेडेड गुज उर्फ (अन्सर इंडिकस/पट्ट कादंमब/पट्टे वाला हंस) या सर्वाधिक उंचीवरून स्थलांतर करणार्या पक्ष्यांबरोबरच इतर अनेक सुंदर पक्ष्यांच्या उपस्थितीमुळे पक्षी निरीक्षक, पर्यटकांच्यात आनंदाचे वातावरण आहे.
स्वप्नील कांबळे
मायणी : दरवर्षी मायणी, येरळवाडी, सूर्याचीवाडी, कानकात्रे या तलावात नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात अनेक देशी-विदेशी पक्षी आपली उपस्थिती लावतात. यावर्षी पक्षांचे आगमन लांबले आहे. वरील चार तलावांपैकी मायणी-कातरखटाव रस्त्यालगत सूर्याचीवाडी गावच्या हद्दीतील तलावात येणार्या अनेक परदेशी पक्ष्यांत बार-हेडेड गुज उर्फ (अन्सर इंडिकस/पट्ट कादंमब/पट्टे वाला हंस) या सर्वाधिक उंचीवरून स्थलांतर करणार्या पक्ष्यांबरोबरच इतर अनेक सुंदर पक्ष्यांच्या उपस्थितीमुळे पक्षी निरीक्षक, पर्यटकांच्यात आनंदाचे वातावरण आहे. परंतु, सर्वांचे आकर्षण असणार्या फ्लेमिंगो (रोहितपक्षी) याची यंदाच्या हंगामातील अनुपस्थितीमुळे पर्यटकांचा हिरमोड होत आहे.
गत काही वर्षे सातत्याने ओढवलेला दुष्काळ यामुळे परदेशी पक्षांनी फिरवलेली पाठ यामुळे पक्षी निरीक्षक ही नाराज होत होते. परंतु, गेल्या दोन वर्षांत पडलेला भरपूर पाऊस यामुळे मायणी पक्षी संवर्धन राखीव क्षेत्रात येणारे सर्व तलाव भरून वाहिल्याने या सर्व ठिकाणी पक्षांची हजेरी लागेल, अशी आशा पक्षी निरीक्षक करीत होते. परंतु, नोव्हेंबर सुरुवातीस येणार्या अनेक पक्षांचे आज डिसेंबर अखेरही आगमन झालेले नाही. त्याचबरोबर गेल्या 40 वर्षांत असणारी अनेक पक्षांची संख्या चांगलीच रोडवल्याचे दिसून येत आहे. यामुळे पक्षी संवर्धनाच्या कार्यात याबाबीकडेही प्रामुख्याने लक्ष देणे काळाची गरज बनली आहे.
मानद वन्यजीव रक्षक तथा पक्षी अभ्यासक रोहन भाटे व वन्यजीव प्रेमी हेमंत केंजळे यांनी आज मायणी पक्षी संवर्धन राखीव क्षेत्रात येणार्या मायणी, सूर्याचीवाडी, येरळवाडी, धोंडेवाडी या तलावांना भेट दिली व पक्षी निरीक्षण केले. त्यापैकी फक्त सूर्याचीवाडी येथे 22 बार-हेडेड गुज, अल्प प्रमाणात नॉर्थन पिनटेल बदक, कॉमन कुट, रेड हेड पोचार्ड, लिटील ग्रीब, ग्रे हेरॉन, ओस्प्रे, हेरीयर, रंगीत करकोचा, पांढरा व काळा आयबीस, काळ्या पंखाचा शेकट्या, ग्रीन शन्क यासह इतरही पक्षी त्यांना आढळून आले.
माहिती पट्टेरी हंसाची :
हा पक्षी फिकट राखाडी रंगाचा आहे आणि त्याच्या डोक्यावर असलेल्या दोन काळ्या पट्यांमुळे सहजतेने ओळखले जाते. पाय नारंगी पिवळे तर चोच पण नारंगी पिवळी व चोचीच्या शेवटी राखाडी टिपका असतो. त्याची लांबी 71-76 सेमीपर्यंत असते आणि त्याचे वजन साधारण 1.87 ते 3.2 किलो पर्यंत असू शकते.
हा सुंदर पक्षी पूर्णतः शाकाहारी आहे. तलावातील शेवाळ, गवत गवताचे बी, ज्वारी, शाळू हे पदार्थ ते खातात. मध्य-चीन आणि मंगोलियामध्ये, काझाकीस्थान, रशिया, तिबेट, दक्षिण आशियातील पर्वतीय तलाव आणि मध्य आशियात बार-हेडेड गुज आढळतात आणि तेथे त्यांचे प्रजनन होते. 10 टक्के पेक्षा कमी ऑक्सिजन आढळतो तेथे ते सहज उडतात व ते देखील जवळपास 17 तास न थांबता पंख फडफडत 1500 किलोमीटरचा पल्ला सहज पार करतो हे अभ्यासाअंती सिद्ध झाले आहे म्हणूनच बार-हेड गुजचे अनेक दशकांपासून जीवशास्त्रज्ञांना आकर्षण आहे.
मायणी व येरळवाडी या तलावांची खोली गाळ उपसल्यामुळे वाढलेली आहे. पाणी मोठ्या प्रमाणात आहे. उथळ पाण्याची आवश्यकता असणारे अनेक स्थलांतरित पाणपक्षी याकारणाने अजून तेथे दाखल झाले नाहीत. परंतु, सूर्याचीवाडीचा महामार्गालगतचा तलाव लहान असूनही याठिकाणी पारंपरिक तलाव टाळून होणारी पक्षांची मोठी उपस्थिती आश्चर्यकारक ठरते.
- रोहन भाटे, मानद वन्यजीव रक्षक तथा पक्षीतज्ज्ञ.
आम्ही 1999 पासून मायणी पक्षी आश्रयस्थान येथे भेट देत आहोत. त्यावेळी ठिकाणी 40 ते 50 प्रकारच्या पक्ष्यांच्या शेकडोंच्या संख्येने असलेली उपस्थिती आम्हाला वेडावून गेली होती. आजही ते प्रसंग डोळ्यासमोर तरंगतात. परंतु, आता पक्षांची कमालीची रोडवलेली संख्या यामुळे अस्वस्थता वाटते. अनेक वर्षांनंतर जोरदार पर्जन्यमानामुळे या भागातील सर्वच भरलेले तलाव यामुळे याठिकाणची पक्षांची संख्या वाढून, नक्कीच पुन्हा याठिकाणी गतवैभव प्राप्त व्हावे व मिळालेला मायणी पक्षी संवर्धन राखीव क्षेत्राचा दर्जा सार्थ ठरावा, अशी आशा व्यक्त करतो.
- मिलिंद हालबे, पक्षी निरीक्षक, सातारा.
सूर्याचीवाडी गावालगत असणार्या तलावात अनेक देशी, विदेशी पक्षी हजारो किमीवरून प्रवास करून येत आहेत. राज्यातून आज पर्यटक याठिकाणी भेट देत आहेत. त्याचबरोबर मायणी पक्षी संवर्धन राखीव क्षेत्रात सूर्याचीवाडी गावाचा समावेश झाल्याने जगाच्या नकाशावर गावची ओळख ठळक बनली असल्याने आज आम्हाला याचा सार्थ अभिमान वाटतो आहे.
- शिवाजी पानस्कर, निसर्गप्रेमी.